21.9 C
Latur
Friday, February 20, 2026
Homeलातूरअवघे लातूर शिवमय; शिवरायांचा जयजयकार

अवघे लातूर शिवमय; शिवरायांचा जयजयकार

लातूर : प्रतिनिधी
रयतचे राजे, बहुजन प्रतिपालक कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती दि. १९ फेब्रुवारी रोजी लातूर शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. भगव्या पताका, विद्यूत रोषणाईचा झगमगाट, फटाक्यांचा कडकडाट, मराठमोळ्या पेहरावात भगवे फेटे बांधून आलेल्या माता- भगिणी अन् शिवरायांचा अखंड जयकार, अशा उत्साही वातावरणात लातुरकरांनी बुधवार दि. १८  फेबु्रवारी रोेजी शिवजन्माचे स्वागत केले. मध्यरात्री लातूर शहर महापालिका आयुक्त मानसी, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी  रोहिणी न-हे-विरोळे  व अन्य महिलांनी बाळ शिवबांचा पाळणा झुलवला अन् सारा परिसर पुन्हा शिवरायांच्या गगनभेदी जयकाराने निनादून गेला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, मनपा उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर,  अभिषेक  शिंदे , सावर्जनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, हंसराज जाधव, विशाल जाधव, डी. एस. पाटील, वैजनाथ जाधव, धनंजय शेळके, नेहरू देशमुख,  अविनाश पाटील, डॉ. रमेश भराटे, डॉ. अभय कदम, डॉ. अमित पाटील, हॉस्टेल असोसिएशनचे विजय जाधव, दत्तात्रय जाधव, विजय गवळी, नितीन पवार,  अ‍ॅड. शिवकुमार जाधव, अ‍ॅड. विजय जाधव, सुंदर पाटील, अभिमन्यू जगदाळे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.  पाळणा उत्सवाचे व्यापक नियोजन करण्यात आले होते. भव्य मंच उभारण्यात आला होता. रात्री ८ वाजेपासूनच महिला, विद्यार्थींनी तसेच नागरीकांनी कार्यक्रमस्थळी येण्यास रांगा लावल्या होत्या. सारा चौक शिवप्रेमींनी गजबजला  होता.  महिला व मुलींची संख्या लक्षणीय होती. जिजाऊंच्या वेशभूषेत अनेक महिला आल्या होत्या. समितीच्या वतीने सर्वांचेच भगवे फेटे बांधून स्वागत करण्यात येत होते.
दरम्यान रात्री ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन  करुन  दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रध्दासुमने वाहण्यात आली. त्यानंतर जिजाऊ वंदना व महाराष्ट्र गितीने डॉ. निशीगंधा  व त्यांच्या संचाने कार्यक्रमास सुरुवात केली. वीर मावळ्यांची  शिवभक्ती, शक्ती व युक्तीचे गुणगाण करणारी गीते आणि पोवाडे सुरू झाले.   शाहीर साबळेंच्या महाराष्ट्र गिताने, डफावरील थापेने, तुता-यांच्या निनादाने, उपस्थितांना शिवभक्तीचे भरते आले होते अवघे वातावरण शिवमय झाले होते. रात्री पावनेबाराच्या सुमारास मनपा आयुक्त मानसी, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ   व अन्य मान्यवर आले. सर्वांचे स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर पाळणा झाला.  फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. साखर वाटून या उत्सवाचा समारोप करण्यात आला.  कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन डॉ. रोहीणी सुर्यवंशी यांनी केले. आभार डी. एस. पाटील यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR