लातूर : प्रतिनिधी
हातभट्टी दारू तयार करणा-या अड्डयावर तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणा-यावर रविवारी पहाटे लातूर पोलीसांनी छापेमारी करत ८३ गुन्हे दाखल करत ५ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि. १६ फेबु्रवारी रोजी पहाटे अचानकपणे मासरेड चे आयोजन करून लातूर जिल्ह्यातील लपून-छपून हातभट्टी तयार करणा-या ठिकाणावर वरिष्ठांचे मार्गदर्शनात जोरदार कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणा-या ८३ लोकांवर ८३ गुन्हे दाखल करून ५ लाख २१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी ३२ पोलीस अधिकारी, ११८ पोलीस अमलदारांचे विशेष पथके बनवून मोहीम राबविण्यात आली. अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसा कडून अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत आहे.