परभणी : शहरातील अवैध नळ जोडणीच्या विरोधात पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक अवैध नळ जोडणी प्रकरणी नागरीकांवर गुन्हे दाखल करीत आहे. तसेच पाणी पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करीत आहे. परंतू अवैध नळ जोडणी प्रकरणी नागरीकांत जनजागृती करून कोणतेही गुन्हे दाखल न करता नळ जोडणी अधिकृत करून घ्यावी अशी मागणी मनपा आयुक्तांकडे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमोल जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महापालिकेच्या उत्पन्नाला बाधा पोहचू नये म्हणून शहरातील नळ जोडण्या अधिकृत कराव्यात याबाबत कोणतेही दुमत नाही. परंतू अनाधिकृत नळ जोडण्या अधिकृत करताना घरपट्टी, बेबाकीची अट काढून टाकण्यात यावी. ज्या नागरीकांची जुनी नळपट्टी बाकी आहे त्यावरील १०० टक्के शास्ती माफ करून नळ जोडण्या अधिकृत कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सदरील नळ जोडण्या आपल्याच लोकांच्या मार्फत नवीन योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने जोडण्यात आल्या होत्या.
त्या अवैध आहेत की अवैध याच्याशी नागरीकांचा संबंध येत नाही. त्यामुळे या संदर्भात नागरीकांत जनजागृती करून कोणताही दंड न लावता व कोणतेही गुन्हे दाखल न करता नळ जोडणी अधिकृत केल्यास नागरीक व मनपा प्रशासनात संघर्ष निर्माण होणार नाही याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमोल जाधव, विजय मोरे, दिगंबर खरवडे, इनायत, शे. सरोवर, पांडुरंग जाधव, प्रदीप सोनटक्के, उमेश मिरखलेकर, रामेश्वर कु-हे, अनिकेत घनसावंत, सतीश पाटील, रोहीदास बोबडे, समर्थ आवचार आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.