22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रअसंघटित महिला कामगारांचा नागपुरात विराट मोर्चा

असंघटित महिला कामगारांचा नागपुरात विराट मोर्चा

नागपूर : जे राजकीय पक्षांना जमले नाही, मोठमोठ्या संघटनांना जमले नाही, ते यंदा असंघटित महिला कामगारांनी करून दाखवले आहे. आयटकच्या नेतृत्वात आलेल्या महिलांच्या मोर्चामुळे नागपुरातील शहीद गोवारी उड्डाणपुलाची वाहतूक बंद करावी लागली आहे. यावर्षीच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात आलेल्या सर्व मोर्चांच्या तुलनेत सर्वांत विराट मोर्चा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक)च्या वतीने काढण्यात आला. मोर्चा काही वेळापूर्वी विधानभवनजवळच्या झीरो माईल टी पॉईंटवर दाखल झाला आहे.

विधानभवनावर आलेल्या मोर्चात महाराष्ट्रातील कानाकोप-यातून हजारो महिला सहभागी झाल्या आहेत. आशा गटप्रवर्तक, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने असंघटित महिला कामगार या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. प्रशासनाने गृहीत धरलेल्या संख्येपेक्षा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व मोर्चेकरी सहभागी झाल्या. नागपूर येथील अधिवेशन काळात पहिल्यांदाच शहीद गोवारी उड्डाणपुलावरची वाहतूक बंद करावी लागली आहे. याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चाच्या दिवशीही एवढी गर्दी झाली नव्हती, तेवढी गर्दी आज जमली.

मोर्चाच्या प्रमुख मागण्या
१) कामगार व कर्मचारीविरोधी कायदे रद्द करा..
२) अंगणवाडी कर्मचा-यांना किमान वेतन २६ हजार रुपये व मासिक पेन्शन द्या..
३) राष्ट्रीय संपत्ती व सार्वजनिक उद्योग व सेवांचे खाजगीकरण व विक्री करण्याचे धोरण मागे घ्या..
४) आठ तासांच्या कामासाठी दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन निश्चित करा. यासह एकूण २२ मागण्या आहेत.

वाहतुकीवर परिणाम
आयटकच्या नेतृत्वात आलेल्या महिलांच्या मोर्चामुळे झिरो माईल ते वैरायटी चौक संपूर्ण वाहतूक थांबवावी लागली आहे. शहीद गोवारी उड्डाणपूल बंद करावा लागला आहे. पूर्ण जागेवर मोर्चातील महिलांना बसवूनही मोर्चेकरी अजून बाहेर शिल्लक आहेत. नागपूर येथील सीताबर्डी ते झिरो माईल अशी वाहतूक या वर्षी पहिल्यांदाच बंद करावी लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR