अहमदपूर तालुक्यात माहे जून महिन्यात उशिरा पावसाने सुरुवात केली. पेरणी योग्य पाऊस झाला नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी तर काही भागात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणीला सुरुवात झाली. शेतक-यांनी महागामोलाचे बियाणे खत पेरले. काही ठिकाणी डबल पेरणी करावी लागली. तालुक्यात पाणीटंचाईचे तीव्र संकट असून अद्यापही नद्या, नाले,तलाव, कोरडे ठाक आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून साठवण तलावात मृत साठ्यापेक्षाही कमी पाणी शिल्लक राहिले आहे.
सप्टेंबर महिना संपत आलेला आहे. तालुक्यातील कुठल्याही नदीला पाणी आले नाही. विहीर, विंधन विहीर या ठिकाणीही पाणीसाठा वाढलेला नाही, नदीला पाणी अद्याप कुठेही वाहिलेले नाही. यामुळे साठवण तलावात नवीन पाणीसाठा आलेला नाही. अहमदपूर शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणा-या लिंबोट धरणामध्ये अद्यापही नवीन पाणी आलेले नाही. यापुढे मोठा पाऊस नाही झाला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करणार आहे.याच तलावातून उदगीर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा, सांडपाण्याचा प्रश्न तालुक्यातील नागरिकांसाठी रौद्ररूप धारण करणार हे मात्र निश्चित.
हाडोळती, शिरूर ताजबंद येथे तिरु नदी प्रकल्पातून ५२ गाव खेडी पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पामध्ये अद्यापही नवीन पाणी आले नसल्यामुळे या भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. याच पद्धतीने किनगाव, अंधोरी, खंडाळी या भागातील नागरिकांनाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत ६९४ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. सध्या अहमदपूर तालुक्यातील ४२ साठवण तलावामध्ये सर्वत्र मृत साठ्यापेक्षाही गतवर्षीचेच पाणी शिल्लक राहिलेले आहे. यावर्षी अद्यापही पाण्यामध्ये वाढ झालेली नाही. तालुक्यात सर्वत्र नद्या, नाले, तलाव, विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या आहेत.
















