अॅडलेड : गुलाबी चेंडूच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने आपल्या विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवत भारतावर मोठा विजय नोंदवला. दुस-या डावात भारताने १७५ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १९ धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाने ऍडलेड कसोटीत भारतावर १० विकेट्सने विजय मिळवला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील दुस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दुस-या डावात भारताची फलंदाजी फळी पूर्णपणे फेल ठरली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे फलंदाज दुस-या डावातही चांगली कामगिरी करू शकले नाहीत. भारतीय संघाने नि:संशयपणे १२८ धावा केल्या. परंतु यादरम्यान त्यांनी ५ मोठ्या विकेट गमावल्या. दुस-या डावात टीम इंडियाची टॉप ऑर्डर सपशेल फेल ठरली. तर रोहित शर्मानेही सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना निराश केले. ऋषभ पंत आणि नितीश रेड्डीने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला पण भागीदारी रचू शकले नाहीत. त्यामुळे भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला.
ऑस्ट्रेलिया पुन्हा अव्वलस्थानी
भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला असून दोन स्थानांचा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण १४ सामने खेळले आहेत, त्यापैकी ९ जिंकले आहेत आणि त्यांची टक्केवारी ६०.७१ आहे. दुसरीकडे भारतीय संघाला पराभवाचा फटका सहन करावा लागला. भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून तिस-या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत १६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ९ जिंकले आहेत आणि ६ गमावले आहेत. भारताची टक्केवारी आता ५७.२९ टक्क्यांवर घसरली आहे.