पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेच जुळ्या मुलांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर परिसरातील हा प्रकार आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून तिच्या भावाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने जुळ्या मुलांची नीट वाढ होत नसल्याने त्यांचा खून केल्याची घटना घडली आहे. घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत बुडवून त्यांना ठार केले आहे. जुळ्या मुलांना टाकीत बुडविल्यानंतर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका महिलेला अटक केली. रहिवाशांच्या सतर्कतेमुळं हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपी महिलेचे पती सांगलीतील एका बँकेत कामाला आहेत. सध्या ती माहेरी राहत होती. तिचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता. विवाहानंतर दहा वर्षे अपत्यप्राप्ती न झाल्याने या दाम्पत्याने कृत्रिम गर्भधारणेचा निर्णय घेतला. टेस्टट्यूबद्वारे तिने दोन मुलांना जन्म दिला. जुळी मुले दोन महिन्यांची होती. मात्र त्यांची वाढ नीट होत नसल्याने महिला तणावात होती.
मंगळवारी ती जुळ्या मुलांना घेऊन घराच्या छतावर गेली. त्यानंतर दोघांना पाण्याच्या टाकीत बुडविले आणि तिनेही पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या भागातील एका रहिवाशाने या घटनेची माहिती तिच्या भावाला दिली. मुलांसह महिलेला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच जुळ्या मुलांचा मृत्यू झाला होता.