धाराशिव: प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागाची बुधवारी दिनांक २३ रोजी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतक-यांशी संवाद साधताना सांगितले की, जिल्ह्यात सध्या दहा ते बारा टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
त्यामुळे सरकार शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही, असे सांगत येत्या दोन दिवसात सदरील परिस्थितीचे आकलन करून मदतीसाठी जीआर काढू ,असे आश्वासन त्यांनी दिले. शेतक-यांना मात्र त्यांच्याकडून आज मदतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली असून आजच्या त्यांच्या दौ-यात धाराशिव जिल्ह्यातील शेतक-यांना केवळ आश्वासनच मिळाले.
धाराशिव जिल्ह्यात पावसाचा ३० ते ५० दिवसाचा सलगचा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. तसेच जिल्ह्यातील अनेक प्रकल्प भर पावसाळ्यात कोरडेठाक आहेत, अशाच कोरडे असलेल्या करजखेडा येथील तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात केवळ दहा ते बारा टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पीक हातचे केले आहे. जरी सोयाबीन पीक हिरवे दिसत असले तरी काही ठिकाणी त्याला शेंगा लागलेल्या नाहीत तर ज्या ठिकाणी शेंगा आहेत त्यामध्ये दाणे भरलेले नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही. सर्वच शेतक-यांना सरसकट मदत मिळाली पाहिजे, सध्या सर्वत्र परिस्थिती गंभीर आहे.
त्यामुळे शेतक-यांना थेट मदत करू. तसेच अन्नधान्य कमी पडणार नाही. मजुरांना रोजगार मिळवून देऊ, जनावरांना चारा व पाण्याची व्यवस्था करू, पीक विमा मिळवून देऊ, सध्या पीक कापणीचे प्रयोग सुरू आहेत त्यामुळे सर्व परिस्थितीचा आकलन करून दोन दिवसात मदतीसाठी जीआर काढू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना दिले.
यावेळी अनेक शेतक-यांची निवेदने त्यांनी स्वीकारली. यावेळी त्यांच्यासोबत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार बसवराज पाटील, आमदार अभिमन्यू पवार, माझी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह भाजप शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करजखेडा येथे दहा मिनिटांचा दौरा
धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगमन होताच कोरड्या तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर शेतक-यांना मार्गदर्शन करत मदतीचे आश्वासन दिले व निवेदने स्वीकारली. त्यानंतर ते कळंब तालुक्याकडे पाहणीसाठी रवाना झाले.धाराशिव तालुक्यात त्यांनी दहा मिनिटे दिली.
















