पंतप्रधान मोदींचा इशारा, ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित
पाकसोबत फक्त पाकव्याप्त काश्मीर, दहशतवादावरच चर्चा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आता दहशतवाद आणि संवाद, दहशतवाद आणि व्यापार सोबत चालणार नाही, तसेच पाणी आणि रक्त सोबत वाहणार नाही. यापुढे पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर फक्त पाकव्याप्त काश्मीरवर आणि दहशतवादावरच होणार असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. यापुढे पाकिस्तानच्या अणवस्त्रांच्या धमकीला घाबरणार नाही. उलट त्यांच्यावर जोरदार कारवाई केली जाईल, असाही इशारा मोदी यांनी दिला. ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित करण्यात आले आहे, थांबविलेले नाही. यापुढे पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबविले नाही तर भारत पूर्ण शक्तीने हल्ला करेल, असा सज्जड दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला.
भारत-पाकच्या लढाईनंतर प्रथमच पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ज्यांनी आमच्या बहिणींचे कुंकू पुसले, त्याचा बदला भारताने घेतला. ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नाही, तर ते देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे रोजी रात्री उशिरा आणि ७ मे रोजी पहाटे संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेचे फलितात रुपांतर पाहिले आहे. भारतीयांच्या बहिणी किंवा मुलींच्या कपाळावरील सिंदूर पुसून टाकण्याचे काय परिणाम होतात, हे आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक अतिरेकी संघटनांनी पाहिले.
आम्ही भारतीय लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आणि त्यानंतर लष्कराने कारवाई करत पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या जबरदस्त हल्ल्यानंतर पाकिस्तान जगभर मदतीची याचना करत होता. त्यानंतर १० मे रोजी दुपारी पाकिस्तानच्या डीजीएमओचा शस्त्रसंधीसाठी फोन आला. तोपर्यंत भारतीय लष्कराने त्यांचे काम पूर्ण केले होते, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. भारत आता पाकिस्तानसोबत दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा करेल असे ठणकावून सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण थांबवली नाही. यापुढे पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवले नाही, तर भारत पूर्ण शक्तीने हल्ला करणार, असे म्हटले.
भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसे उत्तर दिले जाणार हे ऑपरेशन सिंदूरमुळे स्पष्ट झाले. ज्या ठिकाणी दहशतवादी तळ आहेत, ती उद्ध्वस्त केली जाणार हे या कारवाईने दाखवून दिले आहे. आता दहशतवादी आणि त्यांना पोसणा-यांना वेगळ््या दृष्टीने न पाहता धडक कारवाई केली जाईल, असेही पंतप्रधान म्हणाले. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे अचूकरित्या उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नव्हती की, भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. जेव्हा राष्ट्र सर्वोच्च असते तेव्हा असे कठोर निर्णय घेतले जातात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
या लढाईत मेड इन इंडिया शस्त्रांनी पाकिस्तानला आपली ताकद दाखवून दिली. हवाई हल्ले असो वा पर्वतीय प्रदेश, प्रत्येक ठिकाणी भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी त्याची क्षमता सिद्ध केली. भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीची याचना केली. तोपर्यंत भारताने आपले लक्ष्य साध्य केले होते. त्यामुळे आम्ही शस्त्रसंधी केली, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
शूर सैन्यांच्या शौर्याला सलाम
गेल्या काही दिवसांत आपण सर्वांनी देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिले. सर्वप्रथम प्रत्येक भारतीयांच्या वतीने शक्तीशाली भारतीय सैन्य, गुप्तचर संस्था आणि शास्त्रज्ञांना सलाम करतो. ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी आपल्या शूर सैनिकांच्या अफाट शौर्याला सलाम करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.