पुणे : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळाले नसले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा आहे. जर योग्य प्रतिनिधित्व मिळाल्यास त्याचा फायदा महायुतीमधील तीनही पक्षांना निश्चित होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार देशातील नागरिकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशातील २५ कोटी लोकांना आम्ही गरिबीच्या बाहेर आणू शकलो. शेतक-यांना विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही १३ हजार कोटी रुपये आजवर दिलेले आहेत. दहा लाख लोकांना सरकारी नोक-या देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये एससी-एसटीच्या उमेदवारांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळालेले आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा प्राप्त झाल्या नाहीत. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र उलटे दिसून येईल. राज्यातील महायुती सरकारने जनतेसाठी अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची एक मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगल्या जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.