39.5 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रआग्रा येथे शिवरायांचे भव्य स्मारक उभारणार

आग्रा येथे शिवरायांचे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्र्यांची माहिती, शासन निर्णय जारी
मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा शिवजयंती दिनी केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यातही आग्रा येथे भव्य स्मारकाची तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले. आता आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे ज्या ठिकाणी कैद राहिले, ती जागा महाराष्ट्र सरकार उत्तर प्रदेश सरकारकडून अधिग्रहित करणार आहे. या जागेवर शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून आग्रा येथील शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालयही या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे.

स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली. या विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे.

शिवरायांची गाथा
सांगणारे संग्रहालय
आग्रा येथील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, ती जागा-वास्तू महाराष्ट्र शासन या प्रकल्पात अधिग्रहित करणार आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे. या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहास मांडला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपक्रम संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी राबविण्यात येणार आहेत.

पर्यटकांसाठी प्रेरणास्थान बनेल
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांना मावळ््यासह मुघलशाहीने कपटाने नजरकैदेत ठेवले होते. परंतु आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने महाराजांनी नजरकैदेतून स्वत:सह शंभुराजे आणि सर्व मावळ््यांची सुटका करून घेतली. या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असलेल्या घटनेबाबत मराठीच नव्हे तर इतिहासप्रेमी पर्यटकांत औत्सुक्य आहे. त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी प्रेरणास्थान बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR