कोल्हापूर : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर उफाळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, हा राजीनामा उशिरा घेतला गेला असून तो म्हणजे एकप्रकारची गुन्ह्याची कबुलीच आहे, अशी परखड प्रतिक्रिया स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
संभाजीराजेंनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले, ‘‘ही हत्या झाल्यानंतर आम्ही अडीच महिन्यांपूर्वीच धनंजय मुंडेंना मंत्रिपदच देऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र, तरी देखील त्यांना मंत्रिपद देण्यात आले.
इतकंच नाही तर त्यांचा राजीनामा मागण्यासही अडीच महिने लागले. जर मुंडेंना किंचितही नैतिकता असती, तर त्यांनी हे मंत्रिपद त्याचवेळी सोडले असते. पण तसे झाले नाही. मंत्रिपदाचे कवच घालून ते आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होते का? आजचा राजीनामा म्हणजे एकप्रकारची गुन्ह्याची कबुलीच आहे!’’
क्रौर्याची परिसीमा ओलांडली : बाळासाहेब थोरात
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी सांगितले, ‘‘स्व. संतोष देशमुख यांच्या मारेक-यांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली आहे. कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारे ते फोटो आहेत. हे सर्व पुरावे ८० दिवसांपासून सरकारकडे होते, पण सरकारने काहीच केले नाही. सरकारने निर्लज्जतेचा कळस गाठला आहे. एखाद्या राजीनाम्याने हा विषय संपणार नाही, आम्ही न्यायासाठी लढत राहू.’’