लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने लातूर येथे आयोजित तिस-या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा आज दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शुभारंभ होत असून तो तीन दिवस म्हणजे १७ मार्चपर्यंत चालणार आहे. हा फेस्टिवल सर्वांसाठी नि:शुल्क असून लातूर तसेच मराठवाडयातील सिनेरसीकांनी या फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा, असे आवाहन मांजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
आजपासून लातूर येथील पीव्हीआर टॉकीज येथे सुरु होणा-या तिस-या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते तर लातुरचे पालकमंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होईल. प्रमुख पाहूणे म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व पुणे फिल्म फेस्टिवलचे अध्यक्ष व ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल व माजी वैद्यकीय व सांस्कृतिक मंत्री आमदार अमित देशमुख हे उपस्थित असतील. याशिवाय धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, लातुरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चक्षण, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच सांस्कृतिक खात्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक खात्याचे संचालक विभीषण चावरे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, लातुरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंढे व लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे आदी उद्घाटन समारंभाला पाहूणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहीती संयोजकांनी दिली आहे. नॉर्वेजियन चित्रपटाने सुरुवात फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन ‘आर्मंड’ या नॉर्वेजियन चित्रपटाने होणार आहे. हाफडन उल्मन टोंडेल या तरुण दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट असून यामध्ये पौगंडावस्थेतील मुलांच्या लैंगीक समस्या यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ही अतिशय उत्कृष्ट अशी प्रायोगिक कलाकृती आहे.
महोत्सवाचा समारोप ‘टू ए लॅन्ड अन्नोन’ या चित्रपटाने होणार आहे. मराठी चित्रपटांमध्ये मराठवाड्यातील दिग्दर्शकाची कलाकृतीचित्रपट महोत्सवात ‘स्रो फ्लावर’ (दिग्दर्शक- गजेंद्र अहिरे), ‘सांगळा (दिग्दर्शक- रावबा गजमल) व ‘निर्जळी’ (दिग्दर्शक- स्वाती कडू) हे तीन मराठी चित्रपट आहेत. यातील रावबा गजमल हे मराठवाड्यातील कलावंत असून त्यांनी आतापर्यंत काही शॉर्ट फिल्म केल्या आहेत. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. याशिवाय चार चित्रपट इतर भारतीय भाषांमधील आहेत. यामध्ये ‘इन रिट्रिट‘ (दिग्दर्शक- मैसम अली), ‘तारीख’, (दिग्दर्शक-हिमज्योती तालुकदार), ‘लेव्हल क्रॉस’ (दिग्दर्शक- अरफाज आयुब) व ‘लच्ची‘ (दिग्दर्शक-कृष्णेगौडा) या चार चित्रपटांचा समावेश आहे.
जागतिक चित्रपट:
महोत्सवात १६ जागतिक चित्रपट आहेत. यामध्ये ‘प्लास्टीक गन’, ‘डेलीरियो’ ‘डार्क मॅटर’,‘ब्लॅक टी’, ‘आउट ऑफ सिझन’, ‘मदर्स किंग्डम’, ‘शहिद’, ‘व्हीएत अॅण्ड नाम’आदी उल्लेखनीय आहेत. अशा रसिकप्रिय चित्रपटांची मेजवानी चार दिवस चालणा-या या महोत्सवात प्रेक्षकांना मिळणार आहे. हा फेस्टिवल जनतेसाठी खुला असून यात नि:शुल्क प्रवेश आहे. चित्रपटांसाठी कसलीही प्रवेशिका नाही. जे आधी येतील त्यांना उपलब्धतेनुसार जागा मिळेल. जिल्ह्यातील चित्रपट प्रेमींनी चार दिवसीय फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.