लातूर : प्रतिनिधी
अलीकडे सायबर गुन्ह्यांचा टक्का वाढला असून यामध्ये सामान्य नागरिकांची मोठी फसवणुक होत आहे. लाखो रुपयांना सायबर गुन्हेगार गंडा घालत आहेत. फसवणुक टाळण्यासाठी, जनजागृतीसाठी आज दि. ३० मार्च रोजी लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ‘लातूर मॅरेथॉन-२.०: एक धाव सायबर सुरक्षेसाठी’ ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा क्रीडा संकुलातून पहाटे ५ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. चॅट करताना, शेअर मार्केट, एखाद्यी फाईल डाऊनलोड करताना अशा अनेक प्रकारातून सायबर गुन्हे घडत असतात. यामध्ये सामान्य नागरिकांची लाखोंची फसवणुक होताना दिसून येत आहे. सायबर गुन्हे शोधण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे आहे. मात्र, थोडी काळजी घेतली तर सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊ शकते. आपली फसवणुक टाळण्यासाठी जागरुक राहण्याची गरज आहे. यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा होत आहे. नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
फसवणुक टाळण्यासाठी चॅटिंग करताना सावध राहा, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपवर अनोळखी लोकांशी संभाषण टाळावे, संशय वाटला तर ब्लॉक करावा. शेअर मार्केट घोटाळयांना बळी पडू नका. सोशल अॅप्सवर अनोळखी लोकांकडून दिलेल्या गुंतवणुक सल्ल्यांवर विश्वास ठेऊ नका. अनोळखी एपीके फाईल्स डाऊनलोड करु नका. अनोळखी स्त्रोतांमधून एपीके डाऊनलोड केल्याने हॅकिंग आणि डेटाची चोरी होऊ शकते. कधीही ओटीपी शेअर करु नका, मित्रांनेही विचारले तरी आधी खात्री करावी. त्यांचे खाते हॅक झाले असेल तर पुढचे लक्ष्य तुम्ही असाल. विश्वासार्ह स्त्रोतांमधून अॅप्स डाऊनलोड करा. अनधिकृत वेबसाईटस् अॅप्स स्टोअर्समधून अॅप्स डाऊनलोड करु नका. तुमच्या डिव्हाईसमध्ये मालवेअर शिरु शकते.