लातूर : प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साजरा करण्यात येणार असून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते बाल शिवबांचा पाळणा झुलवून त्यास प्रारंभ होणार आहे. यावेळी महिला अधिकारी, कर्मचा-यांसह महिला, विद्यार्थींनी व शिवप्रेमींची उपस्थिती राहणार आहे.
यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच पुतळा परिसर भगव्या पताका व विद्यूत रोषणाईने सजवला जात आहे. पुतळ्याचे कठडे व आतील भागात फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता जगद्गुरु नरेंद्र माऊली गुरुकुलचे विद्यार्थी लेझीम सादर करणार आहेत. शिवशाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर यांचा पोवाडे व शिव गितांचा कार्यक्रम होणार आहे. मंचावर सजवलेला पाळणा राहणार असून त्यात बाल शिवबांची मूर्ती असेल. रात्री १२ वाजले की तुता-यांचा निनाद, फुलांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी केली जाईल. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते बाल शिवबांचा पाळणा झुलवला जाईल व पाळणे गाईले जातील. यावेळी विविध विभाग व क्षेत्रातील महिला अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थीनींची उपस्थिती असेल. साखर वाटपाने या कार्यक्रमाची सांगता होईल.