लातूर : प्रतिनिधी
पर्जन्य छायेखालील भाग म्हणून लातूर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे दरवर्षीचा पावसाळा लातूर जिल्ह्यात असमतोलच असतो. परिणामी कधी चांगला पाऊस तर कधी जेमतेम पाऊस अशी परिस्थिती असते. यंदाही पावसाचे वार्षिक सरासरी न गाठल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात पाणीसाठा झाला नाही. उदगीर तालुक्यातील तिरु आणि रेणापूर तालुक्यातील व्हटी प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली आहे. तर उर्वरीत सहा मध्यम प्रकल्पांत केवळ २१.८४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच पाणीटंचाईच्या झाला बसण्याची भिती जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पाटबंधारे प्रकल्पांत पाणीसाठा अत्यल्प झाला आहे. त्यामुळे लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची भिती असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यंदा जिल्ह्यात उशिराने मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही विलंब झाला. असे असले तरी पिकांपूरता पाऊस झाल्याने पिके चांगली आली होती. परंतु, ऑगस्टमध्ये जवळपास महिनाभर पावसाने उघडीप दिली. परिणामी खरिपाच्या पिकांचे नूकसान होऊन उत्पन्नात मोठी घट झाली. जिल्ह्यातील प्रमुख नद्या, नाले, ओढे संपूर्ण पावसाळा संपला तरी वाहिले नाहीत. तसेच विहिरी, कुपनलिकांमध्ये पाण्याचा साठा झाला नाही. त्यामुळे हिवाळ्यातच पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे.
मान्सूनच्या पावसाने दगा दिला तरी परतीचा पाऊस लातूर जिल्ह्यासाठी नेहमीच वरदान ठरतो. परंतू, यंदा परतीच्या पावसानेही निराशा केली. त्यामुळे जिल्ह्यातील २ मोठे, ८ मध्यम आणि १३४ लघू प्रकल्पांतील पाणीपातळी खालावली आहे. परिणामी पाणीटंचाईची भिती वाढू लागली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार केला. प्रकल्पांवर असलेल्या मोटारी काढून घेण्याच्या सूचना संबंधीत शेतक-यांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. प्रकल्पांतील पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी करु नये, म्हणून सूचना करण्यात आल्या आहेत. मोटारीद्वारे पाणी शेतीसाठी उपसा होत असल्याचे आढळूुन आल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशानाने दिला आहे.