नागपूर : प्रतिनिधी
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले होते. आता या प्रकल्पानंतर आणखी एक महाराष्ट्रात येणारा मोठा प्रकल्प गुजरातला गेला असल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे हा प्रकल्प नागपूरला येणार होता. तब्बल १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला रिन्यूएबल ऍण्ड ग्रीन एनर्जी कंपनीचा (रिन्यू) सोलर पॅनल प्रकल्प गुजरातला गेला आहे.
महाराष्ट्रात उद्योगासाठी आकारण्यात येणारे वीजदर जास्त असल्याचे तसेच अधिका-यांचे प्रयत्न अपुरे पडल्याने हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची माहिती आहे.
हा प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात ३०० एकर जागेवर होणार होता. तीन हजार युवकांना रोजगार देण्याची कंपनीची योजना होती. मात्र, हा प्रकल्प गुजरातला गेल्याने स्थानिकांची निराशा झाली आहे.
याआधी जे प्रकल्प गुजरातला गेले ते महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे गेल्याची टीका शिंदे गटाकडून करण्यात येत होती. मात्र, आता महायुतीच्या काळातही मोठे प्रकल्प गुजरातला जात असल्याने महाविकास आघाडीच्या निशाण्यावर महायुती सरकार असणार आहे.
नागपूरला येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकल्प गुजरातला जात असल्याने महाविकास आघाडी हा प्रचारात मोठा मुद्दा बनवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या आधी महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.