कोलकाता : भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील आणखी एक सीमापार प्रेमकथा चर्चेत आली आहे. पाकिस्तानी महिला जावेरिया खानम ही कोलकातामधील प्रियकर समीर खानशी विवाह करण्यासाठी वाघा-अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरुन मंगळवार, ५ डिसेंबर रोजी भारतात दाखल झाली आहे. अटारी सीमेवर जावेरिया हिचे समीरच्या कुटुंबीयांनी ‘ढोल’च्या तालावर स्वागत केले.
भारतात दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना जावेरिया म्हणाली की, कोरोना काळामुळे समीर खान आणि माझा विवाह सुमारे पाच वर्ष रखडला. मला यापूर्वी दोनवेळा व्हिसा नाकारण्यात आला. आता मला ४५ दिवसांचा व्हिसा देण्यात आला आहे. मला भारतात येऊन खूप आनंद झाला आहे. येताच मला इथे खूप प्रेम मिळत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मी समीरबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. कोलकाता येथील समीर खान आणि कराचीची राहणारी जवेरिया यांची जर्मनीमध्ये शिक्षण घेत असताना भेट झाली. तिथे दोघेही प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांची २०१८ मध्ये एंगेजमेंटही झाली. मात्र कोरोना साथीमुळे त्यांचा विवाह लांबला. कोरोनामुळे जवेरिया आणि मला जर्मनीहून आपापल्या देशात परतावे लागले, असे समीर खान सांगतो.