लातूर : प्रतिनिधी
मागील २१ दिवसांपासून सुरु असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाची सोमवार दि. १७ मार्च रोजी रात्री शोभेच्या दारुची आतिषबाजी करुन सांगता करण्यात आली. सोमवार या निमित्त महाआरती झाल्यानंतर रात्री काल्याचे किर्तन, दहीहंडी, पालखी व महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले.
मराठवाड्यासह राज्यात प्रसिद्ध असणारी सिद्धेश्वर यात्रा महाशिवरात्रीच्या दिवशी दि. २६ फेब्रुवारी रोजी सुरु झाली होती. मागील २१ दिवस यात्रेनिमित्त लाखो भक्तांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. भक्तांसह नागरिक व अबालवृद्धांनी यात्रा महोत्सवाचा आनंदही घेतला. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह कृषी व पशुप्रदर्शन, रक्तदान शिबिर, महिलांकडून रुद्र पठण यासारख्या उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांना भरभरुन प्रतिसाद मिळाला. यात्रा कालावधीत मान्यवर लोकप्रतिनिधी व अधिका-यांनी भेट देऊन श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेतले.
सोमवार दि. १७ मार्च रोजी यात्रा महोत्सवाची सांगता झाली. सोमवार असल्याने रात्री ८ वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर हे सपत्नीक उपस्थित होते. ज्येष्ठ विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, बबन भोसले पाटील यांच्या अर्धांगिनी जिल्हा कोषागार अधिकारी सौ. उज्वलाताई, विभागीय माहिती संचालक डॉ. श्याम टरके व त्यांच्या अर्धांगिनी तसेच विश्वस्त अशोक भोसले, सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह बिसेन, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे, ओमप्रकाश गोपे, राहुल किनीकर आदींची यावेळी उपस्थिती होती. महाआरतीनंतर शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली. आतिषबाजीने आसमंत उजळून निघाला. रात्री ९ वाजता माधव महाराज शिवणीकर यांचे काल्याचे किर्तन झाले. मध्यरात्री १२ वाजता दहीहंडी झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.