25.8 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रआता अपघातशून्य एस. टी. बसचे ध्येय

आता अपघातशून्य एस. टी. बसचे ध्येय

मुंबई : प्रतिनिधी
सुरक्षितता अभियानाच्या माध्यमातून चालक व इतर कर्मचा-यांमध्ये जनजागृती करून वर्षभर अपघात शून्य एसटीचे ध्येय साध्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा विश्वास एसटी महामंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला. एसटीने सुरू केलेल्या सुरक्षितता अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

गेली ७५ वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला हक्काचे प्रवासी दळणवळणाचे साधन म्हणून एसटी सुरक्षित सेवा देत आहे. म्हणूनच सुरक्षित प्रवास.. म्हणजे एसटीचा प्रवास…! असा विश्वास सर्वसामान्य प्रवाशांच्या मनात तयार करण्यात एसटी यशस्वी झाली आहे. हा विश्वास आणखी वृद्धिंगत करण्याचा महामंडळाचा प्रयत्न राहणार आहे, असेही डॉ. कुसेकर यांनी सांगितले. पुढील काळात जास्तीत जास्त सुरक्षित प्रवास कसा देता येईल, यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करणार आहे. त्यामुळे एसटी बस प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे.

अपघात विरहित सेवा देण्यामध्ये चालक हा महत्त्वपूर्ण घटक आहे. एसटीच्या कर्मचा-यांची मानसिक स्थिती कर्तव्यावर असताना चांगली राहील, असे वातावरण निर्माण करणे हे एसटीचे अधिकारी व पर्यवेक्षक यांचे महत्त्वाचे काम आहे. त्यासाठी कर्मचा-यांचे विश्रांतीगृहे, तेथील प्रसाधनगृहे अत्यंत स्वच्छ असली पाहिजेत. त्यांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी पुरेशी झोप मिळाली पाहिजे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या वेळोवेळी झाल्या पाहिजेत. चालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

डुलकी किंवा वेग हेच अपघाताचे कारण
डुलकी लागणे व वेगाने वाहन चालवणे ही अपघातामागची प्रमुख कारणे आहेत. एसटी चालकांनी याबाबत जागृत राहिले पाहिजे. त्यासाठी कर्तव्यावर जाण्यापूर्वी आपला आहार आणि पुरेशी झोप याबाबत दक्षता घेतली पाहिजे, असे वाहतूक विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले. याबाबत अधिक जागरुकता दाखविल्यास अपघाताचे प्रमाण आपोआप कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR