38.1 C
Latur
Friday, April 25, 2025
Homeक्रीडाआता आयसीसी स्पर्धेतही भारत पाकशी खेळणार नाही?

आता आयसीसी स्पर्धेतही भारत पाकशी खेळणार नाही?

पहलगाम हल्ल्यानंतर बीसीसीआयचे आयसीसीला पत्र

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे. आयसीसी स्पर्धेतील साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाऊ नये, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. याबाबत बीसीसीआयने आयसीसीला पत्रही लिहिले आहे.

भारत आणि पाकिस्तानचा संघ फक्त आयसीसी स्पर्धा किंवा एसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येतात. बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहून भारत आणि पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेत एकाच गटात ठेवू नये, अशी मागणी केली आहे. जर दोन्ही संघ उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पोहोचले तर ती वेगळी बाब असेल असेही बीसीसीआयने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. ही स्पर्धा येत्या सप्टेंबर महिन्यात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ पात्र ठरला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे दोन्ही देशांत क्रिकेटचा सामना होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यानंतर २०२६ मध्ये पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. याआधी पुरुष आशिया चषक आयोजित केला जाणार आहे, ज्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होण्याची शक्यता आहे.

या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या गट ‘अ’ मध्ये आहेत. या गटात यूएई आणि हाँगकाँग यांचाही समावेश करण्यात आला आहे. तर, गट ‘ब’ मध्ये बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि ओमान यांचा समावेश आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान एकाच गटात राहतात की याबाबत आयसीसी वेगळा निर्णय घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अद्याप या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. वेळापत्रक मे पर्यंत येण्याची शक्यता आहे. परंतु, ते बीसीसीआय आणि पीसीबीमधील समन्वयावर अवलंबून असेल. दोघांमध्ये तणाव वाढला झाला तर ही स्पर्धा रद्द देखील केली जाऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR