पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट स्थानक परिसरात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऐन गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने एकच धक्का बसला आहे. याप्रकरणी सर्वच स्तरांवरून संताप व्यक्त केला जात आहे. अशात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आरोपीला अटक करण्यात यावी, अशा घटना राज्यात पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच, पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलिस स्थानकही आहे. तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत अत्याचार करण्यात आल्याने सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असे रोहित पवार म्हणाले.
संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यभरात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात. इतकेच नाही तर महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत तत्काळ निर्णय होईल, ही अपेक्षा, असेही म्हटले आहे.