मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बाईक टॅक्सी धावणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर राज्य सरकारकडून या निर्णयाला हिरवा झेंडा मिळाला असून लवकरच राज्यात बाईक टॅक्सी धावणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी (२ एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बाईक टॅक्सीला मंजुरी मिळाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांसमोर दिली आहे. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आम्ही ई-बाईकला चालना देणार असून पेट्रोलवर धावणा-या बाईकला मंजुरी मिळणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘‘आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत बाईक टॅक्सीच्या मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात झालेल्या आजच्या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे. एका प्रवाशाला जी गैरसोय होत होती, रिक्षा किंवा टॅक्सीसाठी तिप्पट भाडे द्यावे लागणार होते. त्यांचे हे कष्ट वाचणार असून पैशांची बचत होणार आहे, असे म्हणत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘‘महाराष्ट्रभर ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
त्यासाठी १५ कि.मी. अंतराची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ५० बाईक एकत्रपणे घेणा-या संस्थेला अशा प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली जाणार आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही चांगली नियमावली बनवली आहे. दोन प्रवाशांमधील पार्टिशन, पावसाळ्यात प्रवासी भिजू नये यासाठी पूर्ण कव्हर असणा-याच ई-बाईकला आम्ही परवानगी देणार आहोत. ई-बाईकला प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण राज्य सरकारने ठरवले आहे’’, असे परिवहन मंत्र्यांनी पुढे नमूद केले.
अधिक माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या ई-बाईक टॅक्सीसाठी प्रवासी भाड्याच्या बाबतीत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. त्याबाबतच्या निर्णयासंदर्भात आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत आलो आहोत. आज धोरणाला मंजुरी मिळाली आहे. कमीत कमी दरामध्ये प्रवाशांना रोजगार कसा देता येणार आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रवासी भाड्यासंदर्भातील नियमावली सरकार तयार करणार आहे. रिक्षात ज्या प्रवासासाठी १०० रुपये लागतात, तो प्रवास ई-बाईक टॅक्सीमध्ये ३० ते ४० रुपयांमध्ये कसा होणार? त्याबाबत आम्ही नियोजन करत आहोत. येत्या एक ते दोन महिन्यांत ई-टॅक्सी बाईक सुरू होतील’’, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.