16.5 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeसंपादकीयआत्मपरीक्षण गरजेचे!

आत्मपरीक्षण गरजेचे!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीला आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करावेच लागणार आहे. धुळीस मिळाल्यानंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी मारायची असेल तर आत्मपरीक्षण आवश्यकच आहे. आघाडीच्या सर्वच नेत्यांना ते मान्य आहे. दारूण पराभवाचे आम्ही आघाडीतील तिन्ही पक्ष संयुक्तरित्या आत्मपरीक्षण करू, असे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. निकालात असे काय घडले ते आम्हाला समजत नाही. हा केवळ काँग्रेस पक्षाचा पराभव नव्हता तर संपूर्ण महाविकास आघाडीचा पराभव होता त्यामुळे आम्ही एकत्र बसून आत्मपरीक्षण करू, असे वेणुगोपाल म्हणाले. आम्ही झारखंड विधानसभा निवडणुकीत बाजी मारली; पण महाराष्ट्रात अपयश आले. या पराभवाची कारणमीमांसा करू, अशी प्रतिक्रिया राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली. महायुतीचा विजय ‘अनपेक्षित’ आणि ‘अनाकलनीय’ आहे, अशी सर्वसामान्य प्रतिक्रिया आहे. उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी या निकालाचे वर्णन ‘अनाकलनीय’ या शब्दातच केले आहे मात्र, हा निकाल अनपेक्षित असला तरी तो अनाकलनीय आहे का याचा शोध घ्यावा लागणार आहे.

कारण ज्या प्रकारे हा निकाल विरोधकांसाठी अनपेक्षित होता तसा तो सत्ताधा-यांसाठीसुद्धा अनपेक्षित होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यातील मतदार आपल्या पाठीशी राहतील, अशी अपेक्षा सत्ताधा-यांनीसुद्धा केली नव्हती. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष पाहता महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची झुंज होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मतदारांनी महायुतीच्या पारड्यात भरघोस मते टाकली. हे सारे अनपेक्षित होते; पण अनाकलनीय निश्चितच नव्हते. मुळात मतदारांच्या मन:स्थितीचे आकलन करण्यात महाविकास आघाडी कमी पडली हेच त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदार आघाडीच्या पाठीशी उभे राहिले आणि त्या विजयाच्या धुंदीतून आघाडीचे नेते बाहेर आलेच नाहीत. या उलट महायुतीच्या नेत्यांनी त्या पराभवापासून धडा घेऊ रणनिती आखण्यास सुरुवात केली. अल्प कालावधीतही सत्ताधारी पक्षाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन मतदारांना आकर्षित केले. ‘लाडकी बहीण’ योजना गेमचेंजर ठरली.

या योजनेमुळे महिला मतदारांचा मतदानाचा टक्का वाढला. ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत आघाडीने धरसोड वृत्ती दाखवली त्याचाही फटका आघाडीला बसला. लोकसभा निवडणुकीतील मतदारांचा कल विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, या भ्रमात आघाडीचे नेते राहिले. अडीच वर्षाच्या कालावधीत एकनाथ शिंदे सरकारने सर्वसामान्य नागरिकांना आकर्षित करणा-या विविध योजना जाहीर केल्या. महिलांना एस. टी. प्रवासात अर्धे तिकिट, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, लाडकी बहीण योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून लोकांना थेट लाभार्थी करण्याचा प्रयत्न सरकारने केला ज्या लाभार्थ्यांना थेट आर्थिक वा इतर प्रकारचा लाभ झाला त्यांनी सरकारच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. लोेकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन महत्त्वाचे ठरले होते.

विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी ऐनवेळी कोणतीच भूमिका न घेतल्याने त्यांना मानणा-या मराठा मतदारांनी त्यांना हव्या त्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे काम केले. त्याचप्रमाणे ओबीसी मतदारही महायुतीच्या पाठीशी राहिले. अजित पवार, एकनाथ शिंदे व भाजपने निवडून येण्याची क्षमता असणा-या उमेदवारांनाच उमेदवारी दिली. महायुतीच्या नेत्यांनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली होती तर आघाडीचे नेते विजय आपलाच आहे या भ्रमात राहिल्याने त्यांना त्याचा फटका बसला. निवडणुकीतील निकालावरून महायुतीच्या बाजूने एक लाट तयार झाली होती असे दिसते. महायुतीतील तीन मुख्य पक्षांना मिळालेल्या जागा पाहता त्या मागे कोणताही एक समाज घटक नव्हता तर विविध समाज घटक होते असेच दिसून येते. या निवडणुकीत महायुतीने जे प्रयत्न केले त्यामुळे त्यांना भरघोस पाठिंबा मिळाला. गत काही महिन्यांतील विविध जाहिराती, मोदींच्या सभा हे घटक ही त्या मागे आहेत.

भाजपने हिंदुत्वाचा लावून धरलेला मुद्दा त्यांच्या यशाला कारणीभूत ठरला, असे म्हटले जात आहे; परंतु त्यात फारसे तथ्य नाही. या निवडणुकीत काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर अशा मोठ्या नेत्यांना जनतेने नाकारले आहे. त्या मागे महायुतीच्या अनेक योजना आणि मायक्रो मॅनेजमेंट असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्या विरोधात एक प्रकारचे जे धु्रवीकरण तयार होते त्याचा त्यांना फटका बसला असावा. प्रस्थापित नेत्यांच्या बाजूने जसे मोठे वलय असते तसा त्यांना छुपा धोकाही असतो. त्यांच्या विरोधात वातावरण तयार होत असतं. स्थानिक असंतोष आणि निवडणुकीतील बदललेले वातावरण याचा फटका या मोठ्या नेत्यांना बसला. यंदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदाराला आपल्याला मत देणं भाग पडेल, अशी स्थिती निर्माण करण्यात महायुतीला यश आले. हे मतदान स्वेच्छेने झाले असले तरी ही अपरिहार्यता कशी निर्माण करायची याचा अभ्यास करून महायुतीने देशाच्या राजकारणात एक वेगळाच पॅटर्न निर्माण केला आहे.

जनमत हे सर्वांत महत्त्वाचे असते, त्याचा अनादर करणे महागात पडत असते. एकूणच निकाल पाहता भ्रष्टाचार, महागाई, कर्जमाफी, शेतक-यांचे प्रश्न, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था असे अनेक प्रश्न प्रचाराच्या गदारोळात गौण ठरलेले दिसले. ही स्थिती चिंताजनक म्हणावी लागेल. निवडणूक प्रचारात महायुतीने बाजी मारली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे आघाडीला जमले नाही. असे अनेक लहान-मोठे घटक आघाडीला मारक आणि महायुतीला तारक ठरले. आघाडीला आता हातपाय गाळून चालणार नाही. जनतेचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करण्यासाठी त्यांना एकमेकांत समन्वय साधून अथक मेहनत करावी लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR