लातूर : प्रतिनिधी
ज्ञान विकास शिक्षण संस्था कारेपूर संचलित आदर्श विद्यालय कारेपूर येथील १९९४-१९९५ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल ३० वर्षानंतर गुरु गौरव व माजी विद्यार्थ्यांचा स्रेह मेळावा (गेट टुगेदर) नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक प्रकाश खडबडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीराम पांचाळ, उपाध्यक्ष त्र्यंबक रेवडकर, सचिव प्रा. मनोजकुमार माने, कारेपूर चे सरपंच प्रवीण माने, अॅड. डी.जे. कापसे, श्रीपतराव माने हे उपस्थीत होते.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. मागील काही काळात मृत्यू पावलेले संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व वर्गमित्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच सर्व शिक्षकांचा सत्कार करून त्यांना चांदीच्या गणपतीची मूर्ती भेट देण्यात आली. तसेच यावेळी जमलेल्या माजी विद्यार्थ्यांतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत अडचणीत असलेल्या एका गरजू वर्ग मैत्रिणीस आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतील गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. यावेळी प्रास्ताविक अॅड. धनंजय कापसे यांनी केले तर धनंजय माने, अॅड. तानाजी कनसे व श्रीमती वैशाली जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व वर्गमित्र-मैत्रिणींचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
श्रीमती वैशाली जाधव यांच्यातर्फे शाळेला, शिक्षकांना भेट वस्तू व वर्गमित्र मैत्रिणींना स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. तसेच अॅड. तानाजी कनसे यांच्या तर्फे शाळेला ग्रंथ संपदा वाढविण्यासाठी देणगी देण्यात आली. यावेळी आभार प्रदर्शन राम गुडले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण लवटे, वाल्मीक मुरकुटे, संभाजी चिकटे, राजू येडते, उत्तम केळे, शिवराज देशमुख, दत्ता कस्तुरे, निवृत्ती खलंग्रे, तुकाराम गुडले, गंगाधर मुके, पृथ्वीराज माने, गोपाळ ठोंबरे, रमेश पुरी, वैजनाथ मानूरे यांनी प्रयत्न केले. तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.