मुंबई : प्रतिनिधी
दिशा सालियानचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी याचिकेतून केला आहे. या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या देशात, महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरणे घडत असतात. कुटुंबीय, आई-वडील हे न्यायासाठी समोर येतात. न्याय मागण्याचा प्रयत्न करतात. पोलिस तपासाला सहकार्य करतात. ही एक प्रथा आहे. पाच वर्षांनंतर त्यांचे म्हणणे आहे की, आमच्यावर दबाव होता. यावर कसा विश्वास ठेवणार तुम्ही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दिशाचे कुटुंबिय, आई-वडील न्यायासाठी समोर येतात, न्याय मागतात आणि पोलिस तपासाला सहकार्य करतात. पाच वर्षांनंतर त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर दबाव होता. याच्यावरती कसा विश्वास ठेवणार? ठाकरे कुटुंब आणि शिवसेना परिवाराला या माध्यमातून पुन्हा एकदा बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
दिशा सालियन प्रकरण काय?
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम केलेल्या दिशा सालियनचा मृत्यू सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच झाला होता. २८ वर्षीय दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूमध्ये केवळ पाच दिवसांचे अंतर होते. ८ आणि ९ जून २०२० च्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिशाचा एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे १४ जून २०२० रोजी सुशांतसिंह राजपूत आपल्या राहत्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आला होता.
आदित्य ठाकरेंचे काय कनेक्शन?
८ जून २०२० ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी सुरू होती. या पार्टीत दिशाचा होणारा नवरा रोहन राय आणि जवळची मंडळी उपस्थित होती. थोड्याच वेळात अचानक या ठिकाणी आलेल्या हायप्रोफाईल व्यक्तींमुळे वातावरण बदलले, असे बोलले जात आहे. या हायप्रोफाईल व्यक्तींमध्ये तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांचा समावेश होता असे सांगितले जात आहे. दिशा सालियनवर अमानुष सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.