मुंबई : प्रतिनिधी
दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीचे आदेश द्या, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली आहे. सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर काय बोलणे झाले? असा सवाल याचिकेतून विचारण्यात आला आहे.
दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरीयो यांच्यासह मुंबई पोलिसांवर या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
इतकेच नाही तर सुशांत आणि रियाच्या मृत्यूवर सवाल उठवणा-या सर्व साक्षी-पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच १३ आणि १४ जून २०२० रोजीचे सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांचे आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे, अशी मागणी वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेतून करण्यात आली आहे.
८ जून २०२० ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी दिशाच्या पार्टीत आदित्य ठाकरेही पोहोचले होते, असा आरोप करण्यात आला आहे. दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंकडून पोलिसांना अनेक फोन करण्यात आले. तसेच प्रत्यक्षदर्शींना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.