18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसोलापूरआदिवासी धनगर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथदिंडी

आदिवासी धनगर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथदिंडी

सोलापूर : हलग्यांचा कडकडाट, ढोल ताशा आणि तुतारीच्या निनांदामध्ये येळकोट येळकोट जय मल्हार … बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करीत आदिवासी धनगर साहित्य संमेलनानिमित्त शिस्तबद्ध अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली. याद्वारे आदिवासी धनगर संस्कृती व परंपरांचे दर्शन घडले.

गजनृत्य, झांज, टिपरी, गजढोल व लेझीम पथकांचे बहारदार खेळ सादर करण्यात आले.
श्री संत सद्गुरु बाळूमामा ट्रस्ट बेलाटी आयोजित पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन दि.२४ व २५ फेब्रुवारी रोजी श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिर विजापूर बायपास हायवे बेलाटी येथे होत आहे. या निमित्ताने शनिवारि दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी बेलाटीचे श्रीराम पाटील यांच्या वाड्याजवळील श्री लक्ष्मी मंदिर येथून या ग्रंथदिंडीस मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. माजी आ. दिलीप माने यांच्या हस्ते पूजन करून ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संमेलनाचे उद्घाटक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस , महाराष्ट्र राज्य सोशल मीडियाचे राज्य अध्यक्ष राजा माने, संमेलन अध्यक्ष माजी आ. एड. रामहरी रुपनवर, संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले,
स्वागत अध्यक्ष श्रीराम पाटील, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे, एम. के. फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे, अमरजीत राजे बारगळ, कवी गोविंद काळे, माजी स्वागत अध्यक्ष प्राचार्य संजय शिंगाडे, साहित्यिक बापूसाहेब हाटकर,
,उपाध्यक्ष संभाजीराव सूळ, सिद्धारूढ बेडगनूर, अण्णाप्पा सतुबर, बाळासाहेब कर्णवर – पाटील, प्रा. कुंडलिक आलदर, बिसलसिद्ध काळे, शेखर बंगाळे, जगन्नाथ पैकेकरी आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

शिस्तबद्धरित्या काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये पालखीसह टिपरी, लेझीम , झांज, गजढोल , गज नृत्य पथके सहभागी झाली होती. महिला व पुरुष गज नृत्य पथकाने बहारदार सादरीकरण केले. टिपरी, लेझीम गजढोल, झांज पथकांनी लक्ष वेधले. जेऊरच्या हलग्यांचा कडकडाट झाला. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस असे खेळांचे विविध प्रकार सादर केले. हलग्यांच्या कडकडाटात, ढोल ताशा आणि तुतारीच्या निनांदात येळकोट येळकोट जय मल्हार … बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण करीत मंगलमय वातावरणात ही दिंडी पुढे संमेलन स्थळी मार्गस्थ झाली.

या पालखीमध्ये भगवत गीता आणि होळकर शाहीतील ऐतिहासिक पुस्तके, श्री संत सद्गुरु बाळूमामा यांची मूर्ती ठेवण्यात आली होती. येळकोट येळकोट जय मल्हार … बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष अशा उत्साही वातावरणात ही दिंडी काढण्यात आली.

या दिंडीमध्ये ज्ञानसंपदा प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, एम. एम. पटेल चॅरिटेबल ट्रस्ट कुंभारी, कमलाबेन पटेल बीएससी नर्सिंग परिचारिका महाविद्यालय कुंभारी, सांगली जिल्ह्यातील म्हसवड येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था यासह शहर जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. तसेच जेऊरचे हलगी पथक आवर्जून सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR