लातूर : प्रतिनिधी
लातूर येथे रविवारी २० जुलै रोज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने डॅमेज कंट्रोल सुरु केले असून कालच्या प्रकारानंतर सूरज चव्हाण यांनी आज सकाळी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत दिलगिरी व्यक्त केली.
रविवारी २० जुलै रोजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात ‘रम्मी’ खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेने रविवारी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर संताप व्यक्त केला होता. यावेळी ‘छावा’च्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते उधळले होते. या प्रकारानंतर लातूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी छावा संघटेनचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे व इतर कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती. यानंतर लातूरच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातून सरकार व राष्ट्रवादी अजित पवार गटावर विरोधकांकडून टीकेची झोड उडाली.
या प्रकरणावर आज सकाळी (२१ जुलै) सूरज चव्हाण यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले, मी लवकरच विजय घाटगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करेन, असे सूरज चव्हाण यांनी म्हटले. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौ-यातून सूरज चव्हाण यांना वगळल्याची माहिती समोर आली. सूरज चव्हाण यांच्या मारहाणीनंतर छावाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.
याचा फटका सुनील तटकरे यांच्या दौ-याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांनी खबरदारी म्हणून सूरज चव्हाण यांना आपल्या दौ-यातून वगळल्याची माहिती आहे. परंतु, सूरज चव्हाण यांच्याकडून, माझ्या बोटाला दुखापत झाल्यामुळे आपण लातूरमध्ये राहून उपचार घेणार आहे, असे सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कालच्या राड्यानंतर अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना तडकाफडकी मुंबईला बोलावून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अजित पवार सूरज चव्हाण यांना नुसती समज देणार की त्यांच्यावर कारवाई करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
- सुरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या एक अश्या दोन पथके सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी मार्गस्थ झाली आहेत. - मारहाणीच्या निषेधार्थ लातूर बंद
अखिल भारतीय छावा संघटनाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाटगे यांना झालेल्या मारहाणच्या निषेधार्थ आज ‘लातूर बंद’ची हाक देण्यात आली आहे. यात सर्व पक्षांनी सहभाग घेतला आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्ते सकाळपासूनच रस्त्यावर फिरून बंदचे आवाहन करत होते. लातूर बाजार पेठेतील व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद करून ‘लातूर बंद’ला प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे या बंदमध्ये भाजप आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील सहभाग घेतला आहे. घाटगे यांच्यावर उपचार सुरू असलेल्या अपोलो रुग्णालयात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत.