मुंबई : (प्रतिनिधी)
चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधासाठी झालेले बदलापूरमधील आंदोलन राजकीय होते असे म्हणणारे मुख्यमंत्रीच विकृत आहेत, नराधमांचे पाठिराखे आहेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. राज्यभरात या घटनेचा निषेध होत असताना मुख्यमंत्री कुठे होते? निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणलीत, पण त्या आधी आपल्या बहिणींना सुरक्षित करा, अशी मागणी त्यांनी केली. विकृतीचा बंदोबस्त करण्यासाठी शनिवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेना भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या आरोपाला प्रत्त्युत्तर दिले. बदलापूरात आगडोंब उसळला तेव्हा मुख्यमंत्री रत्नागिरीत मिरवत होते. कितीतरी गाड्या भरून तिथे गेले होते. बरेचसे मंत्री बरोबर होते. त्यांच्यासोबत गुलाबी जॅकेटही होते. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. हा काय फॅशन शो चाललाय का ? असा सवाल करताना, सरकार असंवेदनशील असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. राखी बांधताना भगिनी म्हणतात, दादा माझे रक्षण कर. पण तोच दादा जर दादागिरी करत असेल तर ती चिरडण्याची हिंमतही सर्व बहिणींमध्ये आहे हे लक्षात ठेवावे असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.