22.9 C
Latur
Thursday, October 2, 2025
Homeमहाराष्ट्र‘आपली एसटी’अ‍ॅपचे लोकार्पण

‘आपली एसटी’अ‍ॅपचे लोकार्पण

मुंबई : ‘वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन’ असे म्हणणा-या प्रवाशांना आता एसटीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. प्रत्येक थांब्यावरील एसटीचा अचूक ठावठिकाणा ‘आपली एसटी’अ‍ॅपद्वारे कळणार आहे. ‘आपली एसटी’ या नावाच्या नवीन अ‍ॅपचे दस-याच्या मुहूर्तावरण लोकार्पण करण्यात आले असून, या अ‍ॅपचा प्रवाशांना लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस वेळेत येत नसल्याने प्रवाशांचा खोळंबा होता. परंतु, प्रवाशांचा एसटी महामंडळावर विश्वास असल्याने कितीही वेळ झाला तरीही ते एसटीची वाट पाहतात. प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी एसटी महामंडळाने कम्युटर अ‍ॅप नव्या रूपात सादर केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अ‍ॅपचे ‘आपली एसटी’ असे नामकरण केले आहे. या अ‍ॅपमुळे सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला.

‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ या कंपनीच्या साहाय्याने विकसित केलेल्या ‘आपली एसटी’ अ‍ॅपमुळे प्रवासी जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळवू शकतील. प्रवासी माहिती केंद्राद्वारे बस कुठून सुटणार आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार याची अचूक माहितीही मिळेल. त्यामुळे प्रवाशांना एसटीची वाट पाहात थांब्यावर तासन्तास थांबण्याची गरज नाही. थेट बस उपलब्धतेनुसार ते थांब्यावर पोहोचू शकतील.

तांत्रिक त्रुटी दूर करणार
एसटी महामंडळातील १२ हजारपेक्षा जास्त बस व राज्यभरातील एक लाखापेक्षा जास्त मार्गांची माहिती अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या अ‍ॅपचा लाखो प्रवासी वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांनी तांत्रिक त्रुटींबाबत सूचित करावे, असे आवाहन सरनाईक यांनी केले.
अ‍ॅपमध्ये तिकिट आरक्षण सेवा

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अ‍ॅपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी उपलब्ध करण्यात आली असून, कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधणे शक्य आहे. लवकरच एसटीच्या सध्या असलेल्या तिकिट आरक्षण अ‍ॅपमध्येही बसची थेट माहिती समाविष्ट केली जाईल. ज्यामुळे आगाऊ तिकिट आरक्षण करणा-या प्रवाशांनाही मोठी सुविधा मिळेल.

अ‍ॅपमध्ये अनेक सुविधा
अँड्रॉईड आणि अ‍ॅपल वापरकर्त्यांसाठी अनेक उपयुक्त सुविधा यात उपलब्ध आहेत. प्रवाशांना जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे, दोन थांब्यांदरम्यान धावणा-या बसच्या वेळापत्रकाची माहिती मिळवणे, आरक्षण केलेल्या तिकिटातील बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक नमूद करून बसचा थेट मागोवा घेणे आदी सुविधांचा त्यात समावेश आहे. सध्या हे अ‍ॅप ‘एमएसआरटीसी कम्युटर अ‍ॅप’ या नावाने प्ले स्टोअरमधून प्रवाशांना डाऊनलोड करता येईल. लवकरच ‘आपली एसटी’ हे नाव प्ले स्टोअरमध्ये दिसेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR