नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून कठोर शब्दांत निषेध केला जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. यावेळी विरोधी पक्षांकडून या कठीण परिस्थितीत सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
राहुल गांधी यांनी नुकतंच त्यांच्या ट्वीटरवरुन दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये त्यांनी पीडित कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. ‘‘मी नुकतंच गृहमंत्री अमित शाह, जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि जम्मू-कश्मीर काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष तारिक कर्रा यांच्याशी पहलगाम येथील हल्ल्याबाबत संवाद साधला. मी सध्याच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली. तसेच पीडित कुटुंबांना न्याय मिळावा असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल’’, असे राहुल गांधी म्हणाले.
त्यासोबतच राहुल गांधींनी ट्वीटरवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सरकारने ठोस पावलं उचलावीत, अशी मागणी केली आहे. ‘‘जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना जीव गमवावा लागला आणि अनेक लोक जखमी झाले, ही बातमी अत्यंत निंदनीय आणि हृदयद्रावक आहे. मी मृत व्यक्तींच्या कुटुंबांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लोक लवकर बरे व्हावेत, अशी आशा करतो. दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देशाची एकजूट आहे. सरकारने जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याच्या पोकळ दाव्यांऐवजी आता जबाबदारी स्वीकारून ठोस पाऊले उचलावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, आणि निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागणार नाही’’, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.