मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटात फुट पडणार अशी चर्चा रंगली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील शिवसेनेचे मंत्री उदय सामंत त्यांच्याकडे २० आमदार असल्याचा दावा केला. तसेच, राज्याचे उद्योगमंत्री म्हणून उदय सामंत हे सोमवारी सकाळी दावोस येथे पोहोचले. याठिकाणी पोहोचताच त्यांनी एक व्हिडीओ जारी केला, ज्यामध्ये विरोधकांनी केलेले दावे खोटे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या दाव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मी झुरीच विमानतळावर उतरल्यानंतर राज्यात माझ्याबद्दल केलेली विधाने मी ऐकली. शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेली विधाने ऐकली. त्यांची विधाने राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला, त्यामध्ये मी सहभागी होतो. त्यामुळेच मला दोनदा राज्याचे उद्योग मंत्रिपद मिळाले असून मला पूर्ण जाणीव आहे. मला राजकीय जीवनात घडविण्यासाठी शिंदे यांनी केलेले प्रयत्न मी कधीही विसरू शकत नाही. असे स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे आणि माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे कोणीही आमच्यात वाद निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. असा इशाराच उदय सामंत यांनी दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार काहीतरी बोलले, असे मला समजले. एकनाथ शिंदे, मी आणि तुम्हीही सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाला आहात. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातून आलेली दोन लोक एकत्र असतील तर त्यांना वेगळे करण्याचे षडयंत्र तुम्ही करू नका. कारण तुम्हीदेखील भाजपामध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना कितीवेळा भेटलात? याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. मी राजकीय मूल्य पाळतो, त्यामुळे मी वैयक्तिक टीका करणे टाळतो. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संपविण्यासाठी असे फालतू षडयंत्र कुणी करू नये, ही माझी सूचना आहे. असे म्हणत त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला.