18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रआमदार अशोक पवारांच्या मुलाचे अपहरण

आमदार अशोक पवारांच्या मुलाचे अपहरण

आमदार अशोक पवारांच्या मुलाचे अपहरण

पुणे : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिरूर मतदारसंघात धक्कादायक प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे दुपारी अपहरण करण्यात आले होते. एका खोलीत कोंडून नग्न अवस्थेत एका महिलेसोबत न्यूड व्हीडीओ शूट करण्यात आल्याचा दावा आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार यांनी केला.
आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार याच्याकडून शिरूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत अँड. असीम सरोदे, मुलगी आम्रपाली पवार, अँड. श्रेया आवले यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. या प्रकरणात एकास अटक करण्यात आली आहे.

यावेळी वकील असीम सरोदे म्हणाले की, शिरूर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार हे उमेदवार असताना निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होत असतात. ऋषिराज पवार हा प्रचाराला जात असताना चार दिवसांपूर्वी ओळख झालेल्या भाऊ कोळपे नावाच्या कार्यकर्त्याने ऋषिराज पवार याला आपल्याला एका मीटिंगला जायचे असे सांगितले आणि शिरूर मतदारसंघातील मांडवगण फराटा या गावातील एका घरात घेऊन गेले. तेथे दोन साथीदारांना बोलावून दरवाजाला कडी लावून ऋषिराज पवार याचे हात-पाय बांधले आणि तिथे एका महिलेला आणून दोघांचे नग्न व्हीडीओ काढण्यात आले.

यावेळी व्हीडीओ कॉलच्या माध्यमातून आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार याने सांगितले की, भाऊ कोळपे नावाचा एक कार्यकर्ता होता जो अगोदर विरोधात होता. मात्र चार दिवसांपासून आमचा प्रचार करत होता आणि चार दिवसांपासून त्याचे मला फोन येत होते. आपल्याला काही लोकांसोबत मीटिंग करायची आहे. मात्र, मी प्रचारात असल्याने टाळाटाळ करत होतो. शनिवारी सकाळपासूनच मी प्रचारात असताना आमचे ठरले होते की, आज दुपारच्या वेळेस आमच्या एका सहका-याच्या घरी जेवायचे आहे.

त्यावेळेस हा भाऊ कोळपे नावाचा कार्यकर्ता माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, आपण जेवायच्या आधी मीटिंग करून येऊ. मी त्याला माझ्या चारचाकी वाहनात घेऊन गेलो. येथील एका गावात गेल्यावर त्यांनी सांगितले की, पुढे चारचाकी वाहन घेऊन जाता येणार नाही तर आपण पुढे दुचाकी घेऊन जाऊ आणि पुढे दुचाकी घेऊन गावातील एका घरात गेलो. तिथं त्याने दोन जणांना बोलावलं आणि माझे हात-पाय पकडले. माझी आणि त्या तिघांची काही काळ झटापट देखील झाली. परत त्यांनी मला मारायची धमकी दिली.

प्रतिक्रिया देताना आमदार अशोक पवार
माझे हात-पाय बांधून कपडे काढले. त्यानंतर महिलेला बोलवलं आणि तिच्यासोबत नग्न अवस्थेत व्हीडीओ काढला. तसेच समोरच्या पार्टीने या व्हीडीओसाठी १० कोटींची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. मी त्यांना पैसे देण्याचा विश्वास व्यक्त केला. यानंतर मी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, असे ऋषिराज पवार याने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR