20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार किणीकरांच्या हत्येचा कट; दोघांना अटक

आमदार किणीकरांच्या हत्येचा कट; दोघांना अटक

ठाणे : प्रतिनिधी
अंबरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात अंबरनाथ शहरातून दोघांना ठाण्यातील गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आल्े आहे. तर या हत्येच्या कटातील दोन जण फरार झाले आहेत. पोलिस पथक त्यांच्या शोधासाठी दिल्लीत दाखल झाले असून, लवकरच दोन्ही आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे पोलिसांनी गुप्त ठेवली आहेत. शिंदेंच्या शिवसेनेतील आमदाराच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूरमधील एका समारंभात आमदाराच्या हत्येचा कट रचला होता. पण, आमदाराने याची माहिती पोलिसांना दिली.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून बालाजी किणीकर हे चौथ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट आहेत. याच गटबाजीतून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात २६ डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वत: आमदार किणीकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली.

याची गंभीरतेने दखल घेत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथमधून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या २ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. याप्रकरणी आमदार किणीकर आणि पोलिसांनी अधिकृतपणे माहिती दिली नाही. तसेच, कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

यापूर्वीही ठार मारण्याच्या धमक्या
खळबळजनक बाब म्हणजे आमदार किणीकर यांना यापूर्वीही ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. किणीकर भावाच्या मुलाच्या लग्नासाठी लातूरला जाणार होते. त्याच लग्न समारंभाच्या ठिकाणी त्यांची हत्या करण्याचा डाव होता. मात्र याची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी अंबरनाथ शहरातून दोघांना ताब्यात घेतले. एकाला खुंटवली गावातून तर दुस-याला स्वामीनगरमधून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. शिवाय किणीकर यांच्या पोलिस बंदोबस्तातदेखील वाढ करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR