मुंबई- अजित पवार यांना पक्षामध्ये घेतल्यामुळे भाजपला तोटा झाला अशा प्रकारची चर्चा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोटामध्ये सुरू आहे. त्यामुळे भाजपचे अनेक नेते आणि संघाशी संबंधित साप्ताहिकांमध्ये अजित पवारांवर टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून संघाला एक विनंती केल्याचे समजत आहे.
अजित पवारांवर टीका करणे टाळा अशी विनवणी भाजपकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांवर टीका करणे टाळा अशा प्रकारची विनवणी भाजपच्या नेत्यांनी संघाच्या पदाधिका-यांना केली आहे. अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज आहे. विधानसभेला सहकार्य ठेवा अशी विनंती भाजपने संघ पदाधिका-यांकडे केली आहे.
मंगळवारी भाजपच्या नेत्यांची संघासोबत आढावा बैठक झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली होती. यावेळी अजित पवारांविषयी चर्चा झाली. अजित पवार सध्या महायुतीचे घटक आहेत. विधानसभेला त्यांची आपल्याला मदत होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे टाळले पाहिजे असा सूर भाजप नेत्यांचा बैठकीत होता.
अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला अशी चर्चा भाजप आणि संघाच्या कार्यकर्ते, नेत्यांमध्ये सुरू आहे. संघाशी जवळीक सांगणा-या साप्ताहिकामध्ये तर थेट अजित पवारांना अपयशाचे कारण ठरवण्यात आले होते. मात्र, भाजप नेत्यांनी संघाच्या नेत्यांना सबुरीने घेण्याचे सांगितल्याचे कळते.