मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हा मुद्दा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या मुद्यावरून नुकताच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात हिंसाचारही उफाळून आला. अशातच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी औरंगजेबाची कबर हा मुद्दा प्रासंगिक नसल्याचे सांगितल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. आरएसएसने मांडलेल्या या भूमिकेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरएसएसचे अभिनंदन केले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आरएसएसने मांडलेल्या या भूमिकेबद्दल मी त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. हीच भूमिका आम्ही मांडली असती तर टीका करणा-यांची रांग लागली असती आणि औरंगजेब आमचा बाप असल्याचं त्यांनी सांगितलं असतं. पण महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबाला इथंच गाडला हे आमच्या छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणींच्या शौर्याचे प्रतीक आहे, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, मी आरएसएसचा कट्टर विरोधक असलो तरी औरंगजेबाचा मुद्दा सद्यस्थितीत प्रासंगिक नसल्याच्या त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.