कळंब : सतीश टोणगे
लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम संपली. सगळ्याच उमेदवारांनी निवडून येण्यासाठी मतदारांना साकडे, लोटांगण घातले होते. मतदारांपर्यंत पोहोचणे व त्यांना मतदानासाठी बाहेर काढणे ही साधी गोष्ट नव्हती. यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. भर उन्हात मतदारांनी रांगेत उभा राहून मतदानाचा पवित्र हक्क बजावला. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, मजूर यांनी मतदाना दिवशी कामावर जाणे टाळून लोकशाहीच्या उत्सवात आनंदाने सहभाग नोंदवला, पण आमची कुणी दखल घेतली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया मतदारांनी दिली आहे.
निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीतील किस्से, मजा व आलेले अनुभव, प्रतिक्रिया सध्या मंदिरातील बैठकीमध्ये रंगू लागल्या आहेत. भर उन्हात घराबाहेर पडून चालत जाऊन मतदान केंद्र गाठले, उन्हात रांगेत उभारून मतदान केले, पण आमचे फोटो मात्र कुठेही झळकले नाहीत. अभिनेते, राजकीय नेते, खेळाडू यांचे फोटो मात्र पेपरमध्ये, टीव्हीवर आल्याने, ‘आम्ही काय रॉकेल घेण्यासाठी रांगेत उभे होतो काय ….!’ अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
सध्या ग्रामीण भागात उन्हामुळे मंदिरामध्ये निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सगळ्यांनाच एका मताचा अधिकार आहे, मात्र मोजक्याच लोकांचे फोटो मीडियावर झळकल्याने मीडियांना व नेत्यांना ट्रोल केले जात आहे. एका गावातील नव्वद वर्षाच्या शारदाबाईंनी नातवासोबत येऊन मतदान केले. त्यांचे फोटो पण काढले पण ते कुठेही दिसले नाहीत. मतदानापूर्वी मात्र उमेदवारांनी समर्थकांच्या घराचे उंबरे झिजवल्याची चर्चा उघडपणे होताना दिसत आहे.
निवडणुका संपल्याने आता कोणता उमेदवार निवडून येईल यावर चर्चा होऊ लागल्या आहेत……फोटोमुळे मतदार चिडले असून, कुणी म्हणतेय रॉकेलसाठी उभे होतो का, तर कुणी पाण्यासाठी तर काही जण रेशन दुकानापुढे रेशन घेण्यासाठी उभे होतो काय…..? अशी प्रतिक्रिया देऊन उमेदवारांच्या समर्थकांना डिवचण्याचा मोका सोडत नाहीत…