16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूर‘आम्ही जरांगे’ मराठी चित्रपट शुक्रवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला 

‘आम्ही जरांगे’ मराठी चित्रपट शुक्रवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला 

लातूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे लढवय्ये नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘आम्ही जरांगे’ गरजवंत मराठ्यांचा लढा हा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारपासून, दि. २१ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांच्या भूमिकांनी नटलेला हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की उतरेल, असा विश्वास या चित्रपटाचे निर्माते डॉ. दत्ता मोरे यांनी लातुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
‘आम्ही जरांगे’  चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अनुषंगाने चित्रपटातील कलाकारांसह निर्माते डॉ. दत्ता मोरे व त्यांच्या सहका-यांनी  मराठवाड्यातील प्रमुख शहरात या चित्रपटाचा मुख्य उद्देश समाजासमोर आणण्यासाठी प्रसार माध्यमांशी संपर्क साधून सुसंवाद केला. यावेळी निर्माते  डॉ. दत्ता मोरे, डॉ. मधुसुदन मगर यांच्यासह मराठा समन्वयक श्याम वडजे, पडद्यावर जरांगे पाटील यांची भूमिका साकारणारे पृथ्वीराज थोरात, पुुरुषोत्तम माने, लातूरचे डॉ. अभय कदम, विजय घाडगे, भगवान माकणे, विजय औंढे, वैजनाथ जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांचे बालपण, तरुणपण आणि मराठा आंदोलन या तीन भूमिका सक्षमपणे पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगून डॉ. दत्ता मोरे म्हणाले की, या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्ही ज्या-ज्या ठिकाणी गेलो, त्या-त्या ठिकाणी रसिक प्रेक्षक जरांगे पाटील यांच्यावर जीव ओवाळून टाकताना आढळून आले. जरांगे पाटील यांचा  संपूर्ण अभ्यास करुन पृथ्वीराज थोरातसह तिन्ही कलाकारांनी त्यांचे वास्तव जीवन, मराठा आंदोलनाचा संघर्ष पडद्यावर साकारल्याचे त्यांनी सांगितले.
छावा मराठा संघटनेचे नेते लातूरचे स्व. आण्णासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पहिला आरक्षण धडक मोर्चा काढला होता.  लातूरकरांना आरक्षणाचा संपूर्ण इतिहास ज्ञात आहे. त्यामुळे लातूरकर या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. लातूरकर आण्णांना व जरांगे पाटलांना नक्कीच साथ देतील, असा विश्वासही डॉ. मोरे यांनी व्यक्त केला. या चित्रपटात राजकारण नसून समाजकारण आहे. हा चित्रपट तरुणांसाठी आहे. आपल्या उद्दीष्टांसाठी जगायचे, लढायचे. मरायचे नाही, हा चित्रपटाच्या निर्मितीमागचा मुख्य उद्देश्य असल्याचेही डॉ. मोरे यांनी सांगितले. जरांगे पाटलांची भूमिका वठविणा-या पृथ्वीराज थोरात यांनी यावेळी बोलताना आपणास सुरुवातीला थोडे दडपण आल्याची कबुली दिली. पण नंतर जरांगे पाटील यांचे व्हिडीओ पाहून आपण स्वत:ला तयार केले. ही उर्जा आपणास छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने मिळाली.
मनोज जरांगे पाटील यांचे विचार घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे. हा चित्रपट पाहून तरुण आत्महत्या करणार नाहीत तर संघर्ष करुन लढवय्ये बनतील, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. या चित्रपटात मकरंद देशपांडे, प्रसाद ओक, सुबोध भावे, अजय पुरकर, कमलेश सावंत, विजय निकम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR