लातूर : प्रतिनिधी
राज्यातील मस्साजोग व परभणी येथे झालेल्या प्रकरणी दिल्ली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य सम्मेलनात मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांना निषेधाचा ठराव मांडण्यास विरोध करणा-या साहित्य मंडळाचा निषेध करण्यात येत आहे. मराठी साहित्य मंडळाचे कांही पदाधिका-यांची वागणूक सरकारचे गुलाम असत्याचे दिसून येत आहे. कौतिकराव ढाले पाटील यांना या प्रकरणी ठराव घेण्यास विरोध करणा-या साहित्यीकां विरोधात आम्ही साहित्यीक सरकारचे गुलाम-गुलाम सत्ताधा-यांना करतो सलाम-सलाम अशा तीव्र शब्दात जेष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिल्ली येथे गेल्या दोन दिवसापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन सुरू झाले आहे. या साहित्य संमेलनात मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढाले-पाटील यांनी मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची झालेली निर्घुण हत्या व परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या तसेच गेल्या दोन वर्षा पासून मणिपूर राज्यात कुकी आणि मैतयी या दोन समाजातील जातीय संघर्ष या सह विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी साहित्य सम्मेलनात ठराव घेऊन निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र कौतिकराव ढाले पाटील यांना साहित्य मंडळाने सदरचे ठराव मांडण्यास परवानगी दिली नाही. या घटनेचा तीव्र शब्दात विनायकराव पाटील यांनी निषेध केला आहे. वास्तविक कौतिकराव ढोले पाटलांची कामगिरी कौतुकास्पद आहे.
साहित्य सम्मेलन स्थळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नांवे देण्यात आली आहेत. यांच्या बद्दल बदनामी करणा-या राहूल सोलापूरकर याच्या व्यक्तव्यां बाबत साहित्य मंडळ कसलीही कारवाई करण्यास पुढे येत नाही. सरकार राहूल सोलापूरकर याला पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. सदरचे साहित्य संमेलन हे सरकारी पैशातून सुरू असल्याने बहुतांश साहित्यीक सरकारचे गुलाम बनून साहित्य मंडळाचे काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितल्या प्रमाणे साहित्यिक व पत्रकार जेव्हा सरकारचे गुलाम होतील तेव्हां लोकशाही धोक्यात येईल हे वास्तव समोर येत आहे. राज्यातील मस्साजोग, परभणी व मणिपूर या प्रश्नांना साहित्य मंडळाने वाचा फोडण्या पासून रोखल्या बद्दल साहित्य मंडळचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे विनायकराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा असल्याचा विश्वास विनायकराव पाटील यांनी दिला आहे. आगामी काळात जनतेच्या विविध करातून जमविलेल्या पैशातून साहित्य संमेलने घेऊ नयेत. समाजातील सामान्य माणसाला न्याय देवून लोकशाहीचे सक्ष्मीकरण साहित्य निर्मितीतून झाले पाहिजे. साहित्यिकांनी समाजातील रंजल्या गांजल्याच्या दु:ख आणि वेदनाना न्याय देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. साहित्यीकांनी सत्ताधारी सरकारचे गुलाम बनू नये अशी अपेक्षा पाटील यांनी केली आहे. साहित्यीकांनी राजाश्रय न स्वीकारता लोकशाहीच्या बळकटी करणासाठी साहित्य निर्मितीच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा असे पाटील यांनी सांगितले.