मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांचा पक्ष आम आदमी पार्टी उमेदवार उतरवणार नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून भाजपाविरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक न लढण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार आहे. पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे परंतु पक्षाच्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत मिळत आहेत.
सूत्रांनुसार, आम आदमी पक्षाचे लक्ष दिल्लीवर आहे, महाराष्ट्रातील मतदारांच्या मनात आणखी संभ्रम निर्माण करायचा नाही ज्यामुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊ शकते असे आप नेत्यांना वाटते.
११ ऑक्टोबर रोजी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी दिल्ली निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यालयात बूथ तयारीसाठी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे राज्य ते बूथ स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. संदीप पाठक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सध्या ‘आप’ने दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे.
महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी लढवणार नाही. एक किंवा दोन विधानसभेच्या जागांसाठी वाटाघाटी करणे व्यर्थ असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. ‘आप’च्या महाराष्ट्र कार्यकारिणीला संघटना विस्तारासाठी निवडणूक लढवायची आहे परंतु वरिष्ठ नेतृत्व त्यात फारसे उत्सुक नाही. इंडिया आघाडीची ताकद वाढवावी असे वरिष्ठांचे मत आहे. मतदारांच्या मनात संभ्रम नको म्हणून महाराष्ट्राच्या निवडणूक मैदानातून आप माघार घेत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आम आदमी पार्टीने २०१९ ची महाराष्ट्र आणि झारखंड दोन्ही विधानसभा निवडणूक लढवल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्रात २८८ पैकी २४ विधानसभा मतदारसंघांत ‘आप’ने उमेदवार उभे केले. त्यातील २३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. झारखंडमध्ये पक्षाने ८१ पैकी २६ जागांवर निवडणूक लढवली. त्यातील सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.