नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचे जवान अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यातच एक सीक्रेट रिपोर्ट समोर आली आहे. पहलगाम हल्ल्याचे प्लॅनिंग लश्कर ए तोयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरीने केले होते. या हल्ल्याबाबत फेब्रुवारीत बैठक झाली होती. सैफुल्लाहने ५ दहशतवाद्यांना या हल्ल्यासाठी तयार केले होते. त्यानंतर मार्चमध्ये हे दहशतवादी भेटले होते. त्यामुळे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तान सरकारचे कनेक्शन जगासमोर उघड झाले आहे.
मार्चमध्ये मीरपूर इथे दहशतवाद्यांची दुसरी बैठक झाली. त्यात सर्व दहशतवादी सहभागी होते. या बैठकीत पहलगाम हल्ल्याचा आराखडा बनला. पाकिस्तानी सैन्यानेही दहशतवाद्यांची मदत केली. सैफुल्लाहने पाच दहशतवाद्यांना सूचना दिल्या. त्यानंतर मीरपूर येथे पहलगाम हल्ल्याचं षडयंत्र शिजले. सैफुल्लाहसोबत बैठकीत अबू मूसा, इदरीस शाहीन, मोहम्मद नवाज, अब्दुल रफा रसूल आणि अब्दुल्लाह खालिद सहभागी होते. सैफुल्लाहला आयएसआयकडून ऑर्डर मिळत होत्या, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
लश्कर ए तोयबाचा सैफुल्लाह पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पमध्ये पोहचला होता. त्याचे फोटोही समोर आलेत. पाकव्याप्त काश्मीरात एक कार्यक्रम झाला होता. १८ एप्रिलला रावलकोटमध्येही कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचे व्हिडिओ समोर आलेत. सैफुल्लाहसोबत ५ दहशतवादी दिसत आहेत ज्यांनी चिथावणी देणारी भाषणे केली.