लातूर : प्रतिनिधी
येथील ऑयकॉन हॉस्पीटलचे सर्वेसर्वा तथा प्रसिध्द किडणी रोग तज्ञ व तेवढेच वादग्रस्त व यापुर्वी एका मजुराचे अपहरण करून डांबून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असलेले डॉ. प्रमोद घुगे व त्याच्या एका नातेवाईकांनी हॉस्पीटलचा सुपरवायझर बाळू भारत डोंगरे यास हॉस्पीटलच्याच एका खोलीत कोडवून रॉडने जबर मारहाण करून खून केल्या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळू भारत डोंगरे रा. इंडिया नगर, लातूर हा डॉ. प्रमोद घुगे यांच्या आयकॉन हॉस्पीटल येथे सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. त्याने डॉ. घुगे यांना पैसे मागितले तेव्हा दि. ११ डिसेंबर रोजी रात्री डॉ. प्रमोद घुगे व त्याचा नातेवाईक अनिकेत मुंडे यांनी बाळू डोंगरे यास एका खोलीत डांबून मिळेल त्या साधनाने बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्यास फरशीवर आपटू-आपटू मारले, तिथेच त्याच्यावर उपचार करण्याचे नाटक करण्यात आले. डॉ. प्रमोद घुगे यांनी स्वत:च शिवाजीनगर पोलिसांकडे एमएलसी पाठविली. त्यानुसार पोलिसांनी प्रेत ताब्यात घेऊन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. दरम्यान मयताच्या नातेवाईकांनी बाळूचा खून झाल्याचा आरोप केला. शवविच्छेदन अहवालातदेखील मयताच्या अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक जखमा असल्याचे अनुमान काढल्यानंतर नातेवाईकांनी एकच आरडाओरडा केला.
शुक्रवारीह्याकाळपासूनच मयताचे नातेवाईक, मित्र यांनी डॉ. प्रमोद घुगे यांना अटक केल्याशिवाय त्यास आमच्या हवाली केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. नातेवाईक मित्र परिवारांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. तिथे मोठ्या प्रमाणात जमाव एकत्र येऊन तो आक्रमक झाला. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवाजीनगर पोलिसांनी मयत बाळू डोंगरे याची आई प्रेमला डोंगरे यांच्या फिर्यादीवरून डॉ. प्रमोद घुगे व अनिकेत मुंडे अशा दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मयताच्या नातेवाईकांनी शुक्रवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुपारी उशिरा प्रेत ताब्यात घेतले असून लातूरचे शहर पोलीस उपअधीक्षक रणजीत सावंत, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी घटनास्थळ रूग्णालयास भेट दिली. सद्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप सागर हे करित
आहेत.