वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
मी टिम कुक यांना आधीच सांगितलेलं आहे की, अमेरिकेत विकले जाणारे आयफोन हे इथेच तयार झालेले असले पाहिजेत, नाहीतर २५ टक्के टॅरिफ द्यावा लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना दिला आहे.
भारतात आयफोन निर्मिती करण्याच्या प्रयत्नात अॅपलच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनच याला विरोध होऊ लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी टिम कुक यांना भारतात आयफोन निर्मित करू नका असे सांगितले होते. मात्र टीम कूक ट्रम्प यांच्या इशा-याला बधले नाहीत, त्यानंतर आता टॅरिफचे अस्त्र उपसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अॅपल, ट्रम्प आणि टॅरिफ हे प्रकरण मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली, तेव्हा अॅपलसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. हे टाळण्यासाठी अॅपलने आपले निर्मिती प्रकल्प भारत किंवा इतर देशामध्ये स्थलांतरित करण्याच्या तयारीला लागला आहे. पण, ट्रम्प यांची इच्छा आहे की, अॅपलने अमेरिकेमध्येच आयफोन्सची निर्मिती करावी. त्यातून आता ट्रम्प यांनी २५ टक्के टॅरिफ लागू करण्याचा इशारा दिला आहे.