ढाका :
आरक्षणाच्या मुद्यावरून बांगलादेशातही वाद पेटला आहे. या वादात आतापर्यंत किमान ६ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून आरक्षण संपवण्याची मागणी करत आहेत. या आंदोलनाने आता हिंसक रूप घेतले आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४०० हून अधिक जखमी झाल्याचे समजते. वृत्तानुसार, बुधवारी सायंकाळी या आंदोलनाला सुरुवात झाली.
दरम्यान, विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत एका मुलासह ६ जणांना गोळी लागली आहे. सुरक्षा दलांच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून विद्यार्थ्यांनी गुरुवारी देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. आंदोलन प्रमुख आसिफ महमूदने म्हटले आहे की, रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा वगळता सर्व बंद राहील. याशिवाय, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसाचारात मृत्यू झालेल्यांबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती स्थापन केली जाईल, असेही म्हटले आहे.
बांगलादेशात १९७१ च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या मुलांना सरकारी नोक-यांमध्ये दिले जाणारे आरक्षण रद्द करण्यासाठी हे आंदोलन होत आहे. ‘ढाका ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने आठवड्याभरापूर्वी या आरक्षणावर बंदी घातली होती. मात्र, पंतप्रधान शेख हसीना यांनी त्याची अंमलबजावणी होऊ दिली नाही.
यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यावर बोलताना शेख हसिना म्हणाल्या, यासंदर्भातील सर्व निर्णय आपल्या हातात आहे. बांगलादेशात ३० टक्के नोक-या युद्धवीरांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामुळेच विद्यार्थी भडकले आहेत. कारण मेरिटच्या आधारावर नोक-या मिळाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.