लातूर : प्रतिनिधी
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश मिळावेत म्हणून आरटीई पोर्टल सुरू करण्यात आले होते. या पोर्टलवर लातूर जिल्हयातून १ हजार २४९ पालकांनी आपल्या पाल्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. कांही पालक आरटीईच्या नव्या नियमामुळे न्यायालयात गेल्याने सदर प्रक्रीया स्थगीत झाली आहे. त्यामुळे मोफत प्रवेशाची प्रक्रीया जुन्या नियमानुसार होणार की नव्या नियमानुसार होणार अशा संभ्रमात सध्या जिल्हयातील पालक आहेत.
आरटीई अंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षा करीता वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणीक द्ष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रीयेस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. १६ एप्रिल पासून पोर्टलवर लिंक देण्यात आली होती. सदर अर्ज दि. ३० एप्रिल पर्यंत अर्ज भरता येणार होते. मात्र यावर्षी पालकांनी मोफत प्रवेश प्रक्रीयेला पालकांनी अल्प प्रतिसाद दिल्याने दि. १० मे पर्यंत शिक्षण विभागाने अर्ज करण्यासाठी पालकांना आणखी एक संधी दिली आहे. मात्र यावर्षापासून शासनाने आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी नवी नियमावली तयार केल्याने कांही पालक न्यायालयात गेले होते. न्यालयाने या प्रवेश प्रक्रीयेला स्थगीती दिली आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रीया पुन्हा जुन्याच पध्दतीने राबणार का मग आज पर्यत ज्या पालकांनी पोर्टलवर प्रवेशासाठी जे ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्या अर्जाचे काय होणार असे अनेक प्रश्न पालकांच्या समोर उभे राहिले आहेत.