लातूर : प्रतिनिधी
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गात २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने प्रवेशाच्या चार फे-या घेतल्या. तरीही जिल्हयात मोफत प्रवेशाच्या १ हजार ८६५ पैकी ३११ जागा शिल्लक राहिल्या. तर १ हजार ५५४ विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिल्याच्या वर्गासाठी मोफत प्रवेश झाले आहेत.
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी लातूर जिल्हयातील स्वंय अर्थसहित २१५ शाळांची नोंदणी झाली होती.या शाळेत १ हजार ८६५ जागेवर मोफत प्रवेश घेण्यासाठी लातूर जिल्हयातील ५ हजार ७६२ पालकांनी पाल्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी २ हजार ५५४ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची लॉटरी लागली होती.
आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या यादीतील १ हजार १७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. प्रवेश शिल्लक राहिल्याने दुस-या यादीतील २५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तसेच तिस-या यादीतील प्रवेशाचा कालावधी दि. १४ सप्टेंबर रोजी संपला. पालकांना मुदतवाढ देवूनही ९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. जागा शिल्लक राहिल्याने दि. २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत चौथी फेरी पार पडली. या फेरीत ३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. या चार टप्यात १ हजार ५५४ विद्यार्थ्याचे मोफत प्रवेश पार पडले. तरीही मोफत प्रवेश ३११ जागा शिल्लकच राहिल्या आहेत.