32 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeराष्ट्रीयआरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता

आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता

पुढील तीन वर्षांसाठी केली नियुक्ती
मुंबई : प्रतिनिधी
जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञ पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. ७ ते ९ एप्रिलदरम्यान होणा-या द्वैमासिक चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीपूर्वी ही नियुक्ती करण्यात आली. पुढच्या ३ वर्षांच्या कालावधीसाठी त्या या पदावर असणार आहेत. सध्या मायकल पात्रा या पदावर कार्यरत आहेत.

पूनम गुप्ता सध्या नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालक म्हणून काम पाहतात. त्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या आहेत आणि १६ व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेच्या संयोजक म्हणून काम करतात. पूनम गुप्ता २०२१ मध्ये एनसीएईआरमध्ये सामील झाल्या. त्यांच्यासोबत वॉशिंग्टन डीसी येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेत वरिष्ठ पदांवर जवळजवळ दोन दशकांचा अनुभव आहे. शिवाय गुप्ता यांनी मेरीलँड विद्यापीठाच्या (यूएसए) दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापनाची पदे भूषवली आहेत आणि दिल्लीतील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट मध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी सदस्य म्हणून काम केले आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसीमध्ये आरबीआय चेअर प्रोफेसर आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्समध्ये प्रोफेसर म्हणूनही त्यांनी काम केले. शिवाय गुप्ता एनआयपीएफपी आणि ग्लोबल डेव्हलपमेंट नेटवर्कच्या बोर्डवर आहेत आणि पॉवर्टी अ‍ॅण्ड इक्विटी व द वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट या जागतिक बँकेच्या सल्लागार गटांच्या सदस्य आहेत. यासोबतच इतर महत्त्वाच्या ब-याच समितीवर त्या कार्यरत राहिल्या आहेत. दिल्ली विद्यापीठातील दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रावरील डॉक्टरेट कार्यासाठी त्यांना १९९८ मध्ये एक्झिम बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR