चेन्नई : वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) चेन्नई सुपर किंग्जचा ५० धावांनी पराभव केला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत १९६ धावा केल्या, त्यानंतर चेन्नईचा संघ फक्त १४६ धावा करू शकला. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नईचा हा आतापर्यंतचा पहिला पराभव आहे. याआधी त्यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ गडी राखून विजय मिळवला होता. २००८ नंतर आरसीबीने चेपॉक स्टेडियमवर सीएसकेला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चेपॉक स्टेडियम हे चेन्नई सुपर किंग्जचा बालेकिल्ला आहे आणि येथे आरसीबीने शेवटचा २००८ मध्ये चेन्नईचा पराभव केला होता. त्या सामन्यात बेंगळुरूने चेन्नईवर १४ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर, दोन्ही संघ चेपॉक मैदानावर ८ वेळा एकमेकांसमोर आले, ज्यामध्ये प्रत्येक वेळी चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला. आता अखेर आरसीबीने चेपॉक स्टेडियमवर सीएसकेविरुद्ध सलग ८ पराभवांची मालिका संपवली.
आरसीबीचा सलग दुसरा विजय
आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी आरसीबीने स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी राखून पराभव केला होता. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पॉइंट्स टेबलमध्ये आपले पहिले स्थान निश्चित केले. दोन्ही सामने जिंकल्यानंतर आरसीबी आता गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.