लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संपातंर्गत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आरोग्यमित्रांना दरमहा २६ हजार रुपये वेतन देण्यात यावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच वेतनात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात यावी. सर्व आरोग्यमित्रांना आजारपणाच्या रजा १०, किरकोळ रजा १०, विशेष अधिकार रजा ३०, सणाच्या सुटया १० लागू कराव्यात. ऍपरॉन ऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावे. ई. एस. आय. सी मधील त्रुटींची पूर्तता लवकरात लवकर करून सर्व आरोग्यमित्रांना ई. एस. आय. सी. कार्ड देण्यात यावे.
कोविड सारख्या जागतिक महामारीत केलेल्या कामाचा मोबदला जोखीम भत्ता देण्यात यावा. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सन २०१८ पासून विना वेतन करीत आहेत. सन २०१८ पासून जॉयनिंग लेटर व मोबदला देण्यात यावा. जॉयनिंग लेटरवर एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असावा. आरोग्यमित्रांचे शासन स्तरावर (डकअड) मध्ये समायोजन करण्यात यावे. आरोग्यमित्रांचे इतर जिल्ह्यात व तालूक्याच्या ठिकाणी बदलीचे धोरण रद्द करावे आदी मागण्यांही करण्यात आल्या आहेत.